क्राईम

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा

 

मोबाईलमध्ये रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचा सीबीआयचा दावा; दिल्ली न्यायालयात आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार

 

नवी दिल्ली : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने लातूर येथील आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्यासह एकूण १४ आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले आहेत. शनिवारी (२१ नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून, खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

 

१४ आरोपींवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप

 

दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, फौजदारी विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत विविध आरोपांचा समावेश आहे.

 

मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये ४५ प्रश्न जुळल्याचा दावा

 

या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये आढळलेल्या प्रश्नांचा आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासानुसार, त्यांच्या मोबाईलमधील रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचे समोर आले आहे.

 

तपासात ‘शिवालिक’ या प्रश्नपत्रिका संचातील रसायनशास्त्राचे सर्व ४५ प्रश्न मोबाईलमधील दस्तऐवजाशी जुळल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ‘कैलास’ संचातील ४५ पैकी ४३ प्रश्न जुळल्याचेही सीबीआयने नमूद केले आहे.

 

२२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम

 

३ मे २०२६ रोजी देशभरात नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली होती.

 

या प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही प्रचंड संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

सीबीआयने सादर केले ३६० साक्षीदारांचे पुरावे

 

या प्रकरणात सीबीआयने न्यायालयात दोन स्वतंत्र आरोपपत्रे दाखल केली आहेत. पहिल्या आरोपपत्रात १३ जणांची नावे असून, त्यामध्ये विषयतज्ज्ञ, खासगी शिकवणी संस्थांशी संबंधित व्यक्ती आणि कथित मध्यस्थांचा समावेश आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात महाराष्ट्रातील शेषराव बजरंग सूर्यवंशी ऊर्फ राज सूर्यवंशी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

 

सीबीआयने आपला खटला मजबूत करण्यासाठी ३६० साक्षीदार, ४२२ महत्त्वाची कागदपत्रे आणि ४३ भौतिक पुराव्यांचा आधार घेतला आहे.

 

आता प्रत्यक्ष सुनावणीकडे देशाचे लक्ष

 

या प्रकरणात अद्याप कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा एनटीएच्या पदाधिकाऱ्याला आरोपी करण्यात आलेले नाही. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात खासगी व्यक्ती आणि विषयतज्ज्ञांच्या कथित साखळीवर संशय व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, सर्व १४ आरोपींनी न्यायालयात निर्दोष असल्याचा दावा केल्याने आता या प्रकरणाची प्रत्यक्ष न्यायालयीन सुनावणी सुरू होणार आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणात न्यायालयात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

header