वनपट्टा धारक शेतकऱ्यांना आता ई के वाय सी केल्यावर मिळणार ‘फार्मर आयडी. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकर करावी ई-केवायसी-तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन.!

वनपट्टा धारक शेतकऱ्यांना आता ई के वाय सी केल्यावर मिळणार ‘फार्मर आयडी.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकर करावी ई-केवायसी-तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन.!

 

मुलचेरा:- राज्य शासनाच्या अँग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमांतर्गत मुलचेरा तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना आता ई-केवायसीनंतर ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे वनहक्क धारक शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल नोंदणी होऊन शासनाच्या विविध कृषी व शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने मिळणार असल्याची माहिती तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली.

तहसीलदार चेतन पाटील यांनी तालुक्यातील सर्व वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी आपल्या वनपट्ट्याची ई-केवायसी तातडीने करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. ई-केवायसीसाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकरी आदिवन पोर्टलद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. तसेच जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा संबंधित गावचे तलाठी, महसूल सेवक (कोतवाल) अथवा कृषी सेवक यांच्या माध्यमातूनही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

ई-केवायसीसाठी आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, वनपट्टा आणि सातबारा किंवा J प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. वनपट्ट्याची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार असून अनुदान, पीकविमा, बियाणे, खत, कृषी अवजारे तसेच इतर शासकीय लाभ थेट खात्यात मिळण्यास मदत होणार आहे. तसेच जमीन व पीकविषयक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असून कृषी कर्ज व आर्थिक योजनांचा लाभ घेताना प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

शासनाच्या योजनांमध्ये पारदर्शकता वाढून पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा आणि शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल नोंद तयार व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील सर्व वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.