नागपुर

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार रोहित पवार यांची भाग्यश्रीताई आत्राम व शाहीनताई हकीम यांच्याशी सदिच्छा भेट

नागपूर : शेतकरी बांधवांच्या न्यायहक्काच्या मागण्या, विविध प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ च्या नियोजनानिमित्त आयोजित या बैठकीदरम्यान *आमदार रोहित पवार यांची माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य सौ. भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम* यांनी सदिच्छा भेट घेतली.

 

या भेटीदरम्यान राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, विविध राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या तसेच ग्रामीण भागाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विशेषतः शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी एकजुटीने संघर्ष उभारणे, आगामी ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

 

आगामी ४ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेण्यावर सर्वांनी भर दिला.

 

यासोबतच महिला सक्षमीकरण, महिलांचा राजकीय क्षेत्रातील सहभाग, ग्रामीण विकास, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि आगामी सामाजिक उपक्रम यावरही चर्चा झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील संवाद, समन्वय आणि विचारांची देवाणघेवाण यांना महत्त्व देत जनतेच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 

या बैठकीला नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील विविध जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकरी, सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक प्रश्न मांडत आगामी आंदोलनाच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदविला.

 

*भाग्यश्रीताई आत्राम* यांचा जिल्हा परिषद, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनुभव आणि शाहीनताई हकीम यांचा सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष, संघटनात्मक एकजूट आणि सामाजिक समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

 

आमदार रोहित पवार यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान झालेली ही सदिच्छा भेट आणि महत्त्वपूर्ण बैठक राजकीय व सामाजिक वर्तुळात लक्षवेधी ठरली.

header