ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले. 

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा मॅराथॉन बैठकीतून घेतला. त्यांनी विभाग प्रमुखांना दायित्व रक्कमेची अगोदर मागणी करून नंतर नवीन कामांची नोंदणी आयपास प्रणालीवर प्राधाण्याने करण्याचे आणि प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियोजन विभागानेही प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा निधी प्राप्त निधीच्या प्रमाणात संबंधीत विभागांना तातडीने बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचे सांगितले.

येत्या काळात जिल्ह्यातील खाणकाम रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कौशल्य विकास विभागाने खाणकामाशी संबंधित प्रशिक्षण सुरू करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष नियोजन करावे, जिल्हा ग्रंथालयाने सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले. विकासनिधी मंजूर असलेल्या सर्व कार्यालयांनी निधी खर्चासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. यासंदर्भात निधी उपलब्धता, प्रशसकीय मान्यता अथवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास संबंधीत विभागाने आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याच्या सूचनाही त्यांनी यसाप्रसंगी दिल्या.

बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.