ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

समाजकल्याण योजनांच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली दि.१२: – सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजकल्याण योजनांच्या मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला बसस्थानक, पंचायत समिती, तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली. शासनाच्या कल्याणकारी योजनांबद्दल नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.

या प्रदर्शनात अनुसूचित जाती, नवबौद्ध, दिव्यांग तसेच मागासवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना, गृहनिर्माण योजना, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण योजना तसेच कृषी व सिंचनविषयक योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः, विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, उद्योजकता प्रशिक्षण आणि परीक्षाफीस सहाय्य योजना यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रमाई आवास योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना, वयोश्री योजना याबाबत ज्येष्ठांनी तर शेतकरी वर्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांची विशेष माहिती घेतली.

नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहता, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी प्रदर्शनातील माहितीपूर्ण पॅनल विभागाच्या कार्यालयात लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही नागरिकांना या योजनांची माहिती मिळू शकेल. शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचाव्यात आणि अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

“योजना नागरिकांसाठी आहेत, त्यामुळे त्यांचा योग्य लाभ घेणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांची माहिती घेत, त्याचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.