सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर
रस्त्यावरील खड्डे कायम,मुलचेरात सुरू आहे जीवघेणा प्रवास
मुलचेरा:मागील तीन वर्षापासून मुलचेरा तालुक्यातील मुख्य रस्ता खड्ड्यात गेल्याने शिवसेना (शिंदे गटाकडून) १ सप्टेंबर रोजी तालुका मुख्यालयात चक्काजाम आंदोलन करण्यात आला.१० दिवसांत सर्व खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासनानंतर शिवसेना शिंदे गटाने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला जवळपास २२ दिवस लोटून गेले. मात्र, या रस्त्यावरील खड्डे जैसे थे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर पडला की काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर बाजार ते तालुका मुख्यालय पर्यंत मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाला होता. मागील तीन वर्षापासून याच परिस्थितीत नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. घोट कडे जाणारा मार्ग असो किंवा आष्टी कडे जाणारा मार्ग या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने तालुक्यात अपघातांचा प्रमाण वाढला. स्थानिकांकडून वारंवार संबंधित विभागाला निवेदन देऊन देखील याकडे अक्षरशा दुर्लक्ष झाल्याने नाईलाजास्तव शिवसेना शिंदे गटाकडून १ सप्टेंबर रोजी मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अल्लापल्लीच्या अधिकाऱ्यांकडून येत्या ३ दिवसांत काम सुरू करून येत्या १० दिवसात रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात येणार असल्याचा लेखी आश्वासन दिल्यावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
विशेष म्हणजे तीन दिवसात खड्डे बुजविण्याचा कामाला सुरुवात करणे गरजेचे होते मात्र असे न करता जवळपास एक आठवड्यानंतर सदर कामाला सुरुवात करण्यात आले. एवढेच काय तर जवळपास २२ दिवस उलटले. मात्र, अजूनही संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले नाही.अंबेला पासून तर गणेशनगर पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पंधरा दिवस लागले आणि सदर काम ठप्प झाले. गणेशनगर ते मथुरानगर बाजार पर्यंत मोठमोठे खड्डे आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच परिसरात सर्वात जास्त वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. मात्र, संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने या परिसरातील खड्डे बुजविण्याचा कामात दिरंगाई केल्याने नागरिकांना अजूनही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणाच्या रस्त्यावर मुरूमचा वापर करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतली असली तरी नागरिकांना अजूनही दिलासा मिळाला नाही. गणेश नगरच्या फाट्या काम ठप्प झाला आहे. मात्र गणेशनगर ते मथुरानगर बाजारपर्यंत अजूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेच्या आंदोलनाला आणि येथील समस्यांना गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.