विदर्भ

एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. २३ : माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे ‘एमएसएस’ ॲप उपयुक्त ठरेल. विशेषतः हे ॲप मराठी भाषेतही उपलब्ध असल्याने राज्यातील उद्योजकांना त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘एमएसएस’ ॲपचे लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट, प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार, ॲप विकास पथकाचे सदस्य, राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईचे प्रतिनिधी, स्वदेशी शोध संस्थानचे सदस्य तसेच विविध शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

स्वदेशी संशोधनातून आत्मनिर्भरतेला चालना मिळेल
एमएसएमई क्षेत्र आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते. कोविडच्या काळात या क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षणाप्रमाणेच माहितीमुळेही व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण होते. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून, त्यांची माहिती सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना त्याचा लाभ घेता येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान मोठे असून, त्यात एमएसएमई क्षेत्राची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. ‘स्वदेशी’च्या विचारातूनच आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त होतो. आपल्या देशातील ज्ञान, संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

भारतीय ज्ञानपरंपरा आणि स्थानिक संशोधनाला प्रोत्साहन देणार – डॉ. आसावरी बापट
स्वदेशी शोध संस्थान ही भारताच्या पारंपरिक आणि स्थानिक ज्ञानपरंपरांचे संशोधन, वैचारिक चिकित्सा आणि सखोल आकलन यांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे. भारतीय इतिहास आणि ज्ञानपरंपरांचे पुनर्मूल्यांकन करून त्यांचा चिकित्सक अभ्यास करणे, संशोधनाच्या माध्यमातून त्यांचे योगदान अधोरेखित करणे आणि समकालीन आव्हानांवर स्थानिक दृष्टिकोनातून उपाय शोधणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे, असे संस्थेच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट यांनी सांगितले.

भारताने ज्ञाननिर्मिती, चिकित्सक विचार आणि मौलिक संशोधनाचे केंद्र म्हणून पुढे यावे, या दृष्टिकोनातून संस्थेचे कार्य सुरू आहे. केवळ भूतकाळाचा गौरव करणे हा संस्थेचा उद्देश नसून, आपल्या बौद्धिक वारशाची चिकित्सक तपासणी करून त्याची वर्तमान आणि भविष्यातील उपयुक्तता शोधणे महत्वाचे आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना संशोधनाची जोड देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी मुंबई चॅप्टर प्रयत्नशील आहे. या ॲपच्या माध्यमातून नवउद्योजकांना संशोधन, संवाद, सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमएसएमई उद्योजकांना शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार  –डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र आणि जागतिक स्तरावर ज्ञानाचे नेतृत्व करणारा देश बनविण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर यासारख्या औद्योगिक केंद्रांमधून या क्षेत्राला चालना मिळत आहे. राज्यातील एमएसएमई क्षेत्राचा विस्तार आणि उद्योजकांना उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घेता त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचविणे आवश्यक आहे, असे स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरचे प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार यांनी सांगितले.

अनेक उद्योजकांना पेटंट, ट्रेडमार्क, बौद्धिक संपदा हक्क तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नसते. ही माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमएसएस’ ॲप विकसित करण्यात आले आहे. विविध शासकीय स्रोतांवरील माहिती एकत्रित करून ती एमएसएमई आणि स्टार्टअप उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याचा या ॲपचा प्रयत्न आहे. उद्योजकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सवलती, योजना आणि सुविधांची माहिती सुलभपणे मिळाल्यास उद्योगवाढीला मदत होईल. भारतातील स्टार्टअप क्षेत्राचा विस्तार आणि युनिकॉर्न उद्योगांची वाढ ही देशाच्या आर्थिक प्रगतीची महत्वाची चिन्हे आहेत. या विकासप्रक्रियेत अधिकाधिक उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून योजनांची माहिती ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध –कुमारी मैथिली पार्थसारथी
एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या आणि गरजा समजून घेण्यासाठी संस्थेने संशोधनाधारित अभ्यास केला. या प्रक्रियेत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे संचालक तसेच एमएसएमई क्षेत्रातील विविध घटकांसह ४० हून अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या अभ्यासातून निधीची अनुपलब्धता आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची पुरेशी माहिती नसणे या प्रमुख समस्या समोर आल्या, असे स्वदेशी शोधाच्या कुमारी मैथिली पार्थसारथी यांनी सांगितले.

या समस्यांवर उपाय म्हणून राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई या सामंजस्य करारातील भागीदार संस्थेच्या सहकार्याने, डॉ. अपूर्वा हरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे ॲप विकसित केले आहे. यामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती ऑडिओ, व्हिडिओ आणि दृश्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ सध्या कार्यरत असलेल्या एमएसएमई उद्योजकांनाच नव्हे, तर नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांनाही या ॲपचा लाभ होणार आहे. स्टार्टअपची व्याख्या, एमएसएमई म्हणजे काय, उद्यम पोर्टलवर नोंदणी कशी करावी, विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, यासंबंधीची माहितीही ॲपमध्ये देण्यात आली आहे.

हे ॲप अधिकाधिक उद्योजकांपर्यंत पोहोचावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ते आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत (सीएसआर) राबविण्यात येत असून, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील विद्यमान आणि नवोदित उद्योजकांना त्याचा व्यापक लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

header