गडचिरोली

गडचिरोलीत २९ नोव्हेंबरला बहुजन विचारांचा जागर! ‘जनता अवेक इंडिया’ राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

गडचिरोलीत २९ नोव्हेंबरला बहुजन विचारांचा जागर! ‘जनता अवेक इंडिया’ राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर होणार मंथन; राज्यभरातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचा सहभाग

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर :

आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाच्या संवैधानिक हक्कांसह विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गडचिरोली येथे प्रथमच राज्यस्तरीय ‘जनता अवेक इंडिया’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंप सोशल एज्युकेशन मुव्हमेंट (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी पोटेगाव मार्गावरील यमुना लॉन येथे हे संमेलन पार पडणार आहे.

महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. मुंबईपासून भामरागडपर्यंतच्या विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, लेखक आणि विचारवंत या संमेलनात सहभागी होणार आहेत.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर होणार चर्चा

संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली आहेत का, यावर संमेलनात विचारमंथन होणार आहे. विशेषतः आदिवासी समाजाचे शिक्षण, आरोग्य, जल-जंगल-जमीन, मातृभाषा, संस्कृती, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे आणि युवकांना विविध क्षेत्रांतील विचारवंतांशी संवाद साधता यावा, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

शाहीरी जलसा आणि आदिवासी युवा संवादाचे आकर्षण

संमेलनात विविध वैचारिक सत्रांसह ‘जागर समतेचा’ शाहीरी जलसा आणि आदिवासी युवा संवाद आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध रॅपर बिपिन तातड यांच्या सादरीकरणातून वंचित समाजाचा इतिहास, संघर्ष, सांस्कृतिक वारसा तसेच फुले-शाहू-बिरसा-आंबेडकर यांचे विचार मांडले जाणार आहेत.

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जितेंद्र मीणा, दादाभाऊ मडावी, ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रशांत रणदिवे, डॉ. संतोष सुरडकर आणि संदीप तेंडोलकर उपस्थित राहणार आहेत. तर आदिवासी युवा संवादात तनुज पेंदोर आणि साधना मडावी सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद ॲड. बोधी रामटेके भूषविणार आहेत.

मोफत करिअर मार्गदर्शनासह दहा मान्यवरांचा गौरव

या संमेलनाच्या निमित्ताने युवकांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षणासंदर्भात माहिती तसेच वनहक्क पट्ट्यांसंबंधी मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय पुस्तकविक्री, बांबू हस्तकला, पारंपरिक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.

सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जनता अवेक इंडिया पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

स्थळ : यमुना लॉन, पोटेगाव मार्ग, गडचिरोली
दिनांक : रविवार, २९ नोव्हेंबर २०२६

 

header