सिरोंचा :
भारतीय संविधानाचा गौरव आणि संविधान निर्मात्यांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी, संविधान दिनाचे औचित्य साधून सिरोंचा शहरातील नगरम चौकाचे ‘संविधान चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यात आले.
मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ आणि नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गम सर यांच्या मागणीची दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने २६ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पाडला. यावेळी नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते व मुख्याधिकारी राहुल राऊत, उपाध्यक्ष बबलू पाशा आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण झाले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजात रुजावीत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.





