गडचिरोली

अहेरीत काँग्रेसची वादळी इनकमिंग ; सिरोंचातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच अहेरी विधानसभा क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून,त्या पक्षाच्या शेकडो प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

सिरोंचा तालुक्यातील गर्कपेठा,सिरकोंडा,पोचमपाल्ली,वियमपाल्ली,वेनालय,बामणी,मद्दीकुंठा,जनमपल्ली व इतर गावातील युवा कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे सिरोंचा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदरहू पक्षप्रवेश सोहळा अहेरी येथील कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.काँग्रेसचा झेंडा हाती घेत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी पक्षाचे दुपट्टे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल,असा विश्वास कंकडालवार यांनी दिला.काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात मनापासून स्वागत आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.रोजच वेगवेगळ्या गावांतील, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.

त्यामुळे याचा फायदा येत्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही,अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.या इनकमिंगमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे.आगामी काळात आणखी किती कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

header