गडचिरोली,(जिमाका),दि.17: जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान व 23 नोव्हेंबर मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, निवडणूक कालावधीत सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेस क्षती पोहचण्यास अथवा मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास अथवा शांतता बिघडवण्यास अथवा दंग्यास किंवा दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
यानुसार मतदान केंद्र व मतमोजणीचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती (संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान केंद्राचे व मतमोजणी ठिकाणाचे परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. मतदान केंद्राचे व मतमोजणी ठिकाणाचे परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करण्यास व निषिद्ध वस्तू बाळगण्यास मनाई असेल. मतदान व मतमोजणी सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. मतदान केंद्राचे व मतमोजणी ठिकाणाचे कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/ वाहनास प्रवेशास मनाई राहील. सदर आदेश 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69- अहेरी विधानसभा मतदार संघाचे मतमोजणीचे ठिकाण दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते निकाल घोषित करेपर्यंत लागू राहील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.