महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा
महसूल विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरुप कार्यक्षमता वाढवून जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा. अशी सुचना करतांना महसूल विभागाला आवश्यक असलेले मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री पदी नियुक्त झाल्यावर प्रथमच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट देवून महसूल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा श्री.बावनकुळे यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली.
अपर महसूल आयुक्त डॉ.माधवी खोडे, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, राजलक्ष्मी शहा, उपायुक्त सर्वश्री डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, मनोज शहा, अनिल गोतमारे, अनिल बनसोड, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
नागपूर महसूल विभागात अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच नायब तहसिलदार आदी संवर्गनिहाय रिक्त् असलेल्या पदांचा श्री.बावनकुळे यांनी आढावा घेतला. विभागाच्या आकृतीबंधानुसार रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्याबाबत त्यांनी यावेळी आश्वस्थ केले. नागपूर विभागाला 70 हजार 135 कोटींचे महसूल उद्ष्टि देण्यात आले होते. त्यापैकी 35 हजार 851 कोटींची वसुली पूर्ण झाली आहे. उर्वरित वसुली मार्च पूर्वी पूर्ण करावीत, अशा सुचना त्यांनी यावेळी केली.
वाळू विक्री धोरणानुसार विभागात 42 डेपोमधून वाळू सुरु आहे. 7 लाख 78 हजार 497 ब्रास वाळुचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 5 लाख 25 हजार 676 ब्रास वाळू जनतेला उपलब्ध झाली आहे. वाळू वाहतूक व उपस्यामधील काळाबाजारमुळे जनतेला सुलभपणे वाळू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी. यासंदर्भात मागणीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्याच्या तत्वावर विचार करण्यात येत असून यासाठी नेमलेल्या नाशिक विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न गोसिखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन, विभागीय वन हक्क समितीवरील अपिलाची सुनावणी, विविध महसूल प्रकरणे, भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देणे तसेच नोंदणी अनुदान विभागाच्या दैनंदिन कामे अशा एकूण ११ विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रारंभी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्वागत करुन नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक शुल्क आदी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा सादर केला. विविध योजना राबवित असतांना येणाऱ्या अडचणी तसेच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबतची माहिती महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना सादर करण्याची सूचना केली.