ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यात 21 व्या पशुगणनेला प्रारंभ, पशुपालकांनी सहकार्य करावे

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यात 21 व्या पशुगणनेची सुरूवात झाली आहे. पशुधनाच्या संख्येनुसार विभागाची पुढील ध्येयधोरणे आणि पशुसंवर्धनविषयक योजना निश्चित करण्यात येतात. प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनेसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची अचुक माहिती देवून सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.चेतन अलोणे यांनी केले.

सध्या सुरू असलेल्या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. त्याबरोबरच गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना एअर टॅगिंग केले जाणार आहे. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे पशुपालन व्यवसाय वाढविण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते.

21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेबर 2024 पासून प्रारंभ करण्यात आला आहे. येत्या 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही गणना पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदी प्रजातींच्या जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अजय ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा तालुक्यात प्रगणक म्हणून राजपत्रित पशुधन विकास अधिकारी डॉ.चेतन अलोणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व पशुपालकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.अलोणे यांनी केले आहे.