गडचिरोली,दि.03 (जिमाका): भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होवु नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे, असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे.
दिनांक २५ एप्रिल रोजी वन परिक्षेत्र गट्टाचे कार्यक्षेत्रात वन्य प्राणी हत्तीचा वावर असल्याची सुचना मिळाल्यावर त्या वन परिक्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा, यागेश शेरेकर व क्षेत्रीय कर्मचारी यांचे मदतीने त्या हत्तीच्या हालचालीवर देखरेख ठेवत होते. त्याच दिवशी हत्ती जंगलाकडे जात असतांना सांयकाळी ०४.३० वाजता कक्ष क्रमांक ५२८ नियतक्षेत्र कियर, उपक्षेत्र नांरगुडा परिक्षेत्र गट्टा येथे जंगलात मोहाफुले व चारोळी गोळा करणे करिता गेलेले श्री गोगलु रामा तेलामी, रा. कियर ता. भामरागड जिल्हा- गडचिरोली वय ३८ वर्षे यांचेवर वन्य प्राणी हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केले. सदरचे माहिती वन विभागाला मिळताच भामरागड वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पवार, व ईतर अधिकारी / कर्मचारी सह घटनास्थळी भेट देवुन घटनेचा पंचनामा करून श्री गोगलु रामा तेलामी यांचे शव विच्छेदनासाठी भामरागड रूग्णालयात पाठविले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
सदर जंगली हत्ती रात्री गट्टा वन परिक्षेत्रातुन भामरागड वन परिक्षेत्रात जात असतांना हिदुर गावात कक्ष क्रमांक ६९२ नियतक्षेत्र कृष्णारचे नजीक असलेल्या माता मंदीरात लग्न संभारभाकरिता पुजा आटोपुन परत येत असतांना हिदुर ता. भामरागड जिल्हा गडचिरोली, या गावातील तीन महिला सौ. राजे कोपा हलामी (वय ५५ वर्षे) सौ वंजे झुरू पुंगाटी (वय ५५ वर्षे) व सौ.महारी देवु वड्डे, वय ४७ वर्ष यांचेवर हत्तीने हल्ला केला त्यात सौ. राजे कोपा हलामी, वय ५५ वर्षे यांचा मृत्यु झालेला असुन ईतर दोन महिलांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
सदर घटनेची माहीती प्राप्त होताच दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेष मीना, घटनास्थळी पोहचले व त्यांनी उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, व ईतर वन विभागाचे कर्मचारी यांना हत्तीला छत्तीसगड राज्याच्या जंगलात हुसकावुन लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचना दिल्या. त्या जंगली हत्तीला गावापासुन दुर जंगलात हाकलण्यासाठी व त्याचे हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हुल्ला टिम व ड्रोन च्या सहयाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यासह सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांचे नियंत्रणात तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, गट्टा, यागेश शेरेकर व वन परिक्षेत्र अधिकारी, भामरागड अमर भिसे, यांच्या नेतृत्वात संयुक्त गस्ती पथक निर्माण करून पुढील कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना वन प्रशासनाने दिल्या आहेत.