ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु

चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत

 मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ  मोहमद मुईझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत भेटीवर आलेल्या अध्यक्ष डॉ  मोहमद मुईझ्झु यांचे सन्मानार्थ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टो) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मालदीवच्या अध्यक्षांसोबत त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ होते.

आपल्या मुंबई भेटीत आपली प्रसिद्ध बॉलीवूड निर्माते व अभिनेते यांचेशी फलदायी चर्चा झाल्याची माहिती देताना श्री. मुइझ्झु यांनी बॉलिवूड निर्माते व दिग्दर्शक यांना संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी तसेच चित्रीकरणासाठी मालदीवमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मालदीवमध्ये दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या शक्यतेचा देखील विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. मालिका व चित्रपटांमुळे मालदीवमधील पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव आणि भारत पुढील वर्षी राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी करत आहेत असे सांगून राष्ट्रपती श्री. मुइझ्झु यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या यशस्वी भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

मालदीवच्या अध्यक्षांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, नवी दिल्लीत स्वीकारण्यात आलेले व्हिजन डॉक्युमेंट उभय पक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरु केल्यामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांना मदत होईल आणि त्यातून पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा प्रमुख भागीदार आहे आणि एक घनिष्ट मित्र आहे. भारत आणि मालदीवमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, आर्थिक व  व्यापार संबंध आहेत. भारताचे ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘सागर व्हिजन’मध्ये मालदीवला विशेष स्थान असल्याचे राज्यपालांनी अध्यक्ष श्री. मुइझ्झू यांना सांगितले.

भारत आता मालदीवच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपालांनी भारतीय व्यावसायिकांना मालदीवशी सहकार्य वाढविण्यात रुची असल्याचे सांगितले.

भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स संपूर्ण मालदीवमध्ये काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय शिक्षक देखील मालदीव मध्ये सेवा देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

          औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी मालदीवचे अध्यक्ष आणि त्यांच्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ प्रीती भोजनाचे आयोजन केले.

          यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम नौदल मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा आदी उपस्थित होते.