ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा

भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे भेट देऊन निवडणूकीसबंधाने पूर्वतयारीचा आढावा घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी, तहसिलदार प्रिती डूडूलवार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री विनीतकुमार यांनी नामनिर्देशन स्विकारण्याच्या कार्यवाहीची पाहणी केली तसेच तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन आचारसंहिता उल्लंघनाच्या आणि निपटारा करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. सिव्हीजिल ॲप वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा 100 मिनीटांच्या आत निपटारा करण्याच्या सुचना त्यांनी आचारसंहिता कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. आचारसंहितेच्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या आणि परवाने अर्ज तसेच ऑनलाईन अर्ज विनाविलंब त्याच दिवशी निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. इव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनकरीता असणारे सुरक्षा कक्ष आणि साहित्य वाटप तसेच मतमोजणी व्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक श्री विनीतकुमार यांनी निरीक्षण करुन त्याअनुषंगाने संबंधीतांना आवश्यक सूचना दिल्या.