ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महायुती ‘सव्वादोनशे’र!

विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले

विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले. एकट्या भाजपला तब्बल १३२ जागांवर विजय मिळाला असून बहुमताच्या जादूई आकडा गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’; प्रचार रंगात आला असताना भाजपने चर्चेत आणलेले ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे मुद्दे; नेत्यांमधील समन्वय आणि बूथ स्तरावर केलेले अत्यंत काटेकोर नियोजन याचा महायुतीला मोठा फायदा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्याआडून केलेली मदतही सत्ताधारी युतीच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे घटक पक्षांमधील एकवाक्यतेचा अभाव आणि जागावाटपापासूनच अनेक मुद्द्यांवर मुख्य नेत्यांमध्ये असलेले वाद महाविकास आघाडीला भोवले. परिणामी विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या २९ जागादेखील (एकूण सदस्यांच्या १० टक्के) आघाडीतील एकही पक्ष मिळवू शकला नाही. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर गाफील राहिलेल्या महाविकास आघाडीला पक्षफुटी, संविधान आदी न चालणाऱ्या मुद्द्यांना महत्त्व दिल्याचाही फटका बसला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, माणिकराव ठाकरे या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निसटता विजय मिळाला. दुसरीकडे महायुतीच्या या ‘त्सुनामी’मध्ये छोटे पक्ष अक्षरश: वाहून गेले. निकालानंतर ‘किंगमेकर’ होण्याची स्वप्ने बघणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.