झाडीपट्टीतील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत दरवर्षी दिवाळी संपताच मंडई, शंकरपटव व्यावसायिक नाटकांच्या मेजवानीला धूमधडाक्यात सुरुवात होत असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने मंडई, शंकरपट अन् नाटकाला सुरुवात होणार आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत असते.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज), ब्रह्मपुरी, सिंदेवाही हे नाट्य कंपन्यांचे केंद्र बनले आहेत. झाडीमंडळात दिवाळीच्या पाडव्यापासून हा औत्सुक्याचा उत्सव चालतो. त्यात ‘मंडई’ हा अतिशय महत्त्वाचा झाडीचा लोकोत्सव झाला आहे. पूर्वी दिवसा शंकरपट व रात्री नाट्यप्रयोग गावागावांत होत होते. मात्र, मध्यतंरी शंकरपटावर बंदी आली होती, त्यामुळे दिवसा ‘मंडई’ अन् रात्री ‘नाटक’ अशी गावपातळीवरची परंपरा बनली. अलीकडे शंकरपटावरील बंदी उठली आणि शंकरपटही पुन्हा भरू लागली आहेत. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्य प्रयोगासाठी यावर्षी 60 हून अधिक नाट्य कंपन्या प्रयोगांसाठी सज्ज झाल्या असून, या कंपन्यांनी वडसा येथे बुकिंगसाठी आपले कार्यालय सुरू केले आहे.
सद्यःस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाली असल्याने मंडई, शंकरपट व नाटकांची धूम सुरू होणार आहे. दरम्यान, एका नाट्यप्रयोगाला 40 ते 60 हजार रुपये कंपनी आकारत असते. यंदाच्या हंगामात या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून कोट्यवधीहून अधिक रूपयांची आर्थिक उलाढाल होणार असल्याची माहिती आहे. यंदा डिसेंबर ते एप्रिलपर्यंत नाटकांचा सिझन चालणार आहे. यामुळे कलाकार, कामगारांना रोजगार मिळणार आहे.
झाडीपट्टी रंगभूमी पोहोचली सीमापार
पूर्वी नाटकांचे प्रयोग झाडीपट्टीच्या चारच जिल्ह्यांत व्हायचे. परंतु, आता मात्र झाडीपट्टी रंगभूमीने गेल्या दोन ते तीन वर्षापासून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांच्या सीमा ओलांडल्या आहेत आणि आता नागपूर व वर्धा जिल्ह्यांतही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. शिवाय या झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगढ राज्यातही झेप घेतली असून, काही नावाजलेल्या नाट्य कंपन्यांनी नाट्यप्रयोग सादर केले आहेत.