ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांनो,योजनेचा लाभ तुम्ही घेतला का?

विशेष मोहीम : अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना चांगली संधी प्रभारी तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार

मुलचेरा :-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
वनपट्टे जमीन असलेल्या आदिवासी कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https:// mahadbtmahait.gov.in या
पोर्टल वर अर्ज करावेत ऑनलाईन लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्वसंमती देण्यात येईल. फलोत्पादन पिकाचे संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरिता ही संधी असून याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी केले आहे.

या योजनांचा घेता येईल लाभ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम- सुटी फुले, मसाला पिके लागवड, हळद लागवड, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण ट्रॅक्टर संरक्षित शेती, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन- मधुमक्षिका वसाहत संच वाटप, काढणीपश्चात व्यवस्थापन – पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्वशितकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतसाखळी, शीतवहन, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांकरिता अनुदान देय आहे.