मंत्री भुसे यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताची व्याप्ती वाढवली आहे. भुसे यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्या पाठोपाठ राज्यगीत वाजवणेही बंधनकारक केले आहे. राज्यगीतामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक महती शालेय वयापासून विद्यार्थ्यांच्या मनांवर बिंबवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे, असे आग्रही मत दादा भुसे यांनी व्यक्त केले.राज्याच्या देदिप्यमान इतिहासाची महती शालेय विद्यार्थ्यांना कळावी, यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने राज्यातील शाळांमध्ये केलेल्या राज्यगीत सक्तीची व्याप्ती आता आणखी व्यापक केली आहे. आता शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही राज्यगीताचा समावेश असणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच नाशिकमध्ये केली. त्यामुळे आता सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्येही ‘जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत रोज सकाळी गुंजणार आहे.
राजा बढे यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्याचे यथार्थ वर्णन करणारे हे गीत महाराष्ट्राने आपले राज्यगीत (Jai Jai Maharashtra Majha) म्हणून स्वीकारले. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले हे महाराष्ट्र गीत शाळांमध्येही वाजवले आणि गायले जावे, याबाबतचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता.