वेलिंग्टन येथे भारताचा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर भारताने ११८ धावांनी आघाड घेण्यात यश मिळवले आहे.
या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक खेळ केला, पण त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. पण त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या डावात ३६८ धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून सलामीला यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी १३० धावांची भागीदारी केली. जैस्वाल ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुलने तिसऱ्या दिवशी सुरुवात चांगली करत दीडशतकी भागीदारी केली.
पडिक्कल ८० धावांवर बाद झाला. पण केएल राहुलने शानदार खेळ करत शतक केले. त्याला शुभमन गिलने साथ दिली होती. केएल राहुल १३६ धावांवर बाद झाल्यानंतरही शुभमन गिल चांगला खेळत होता. त्याने आक्रमक शॉट्स खेळत अर्धशतक केले होते.
त्यानंतरही तो रिषभ पंतला साथीला घेत चांगला खेळ करत होता. गिल शतकाच्या अत्यंत जवळ होता. मात्र दिवसाच्या शेवटच्या १२५ व्या षटकात जेकॉब डफीने गिलला ९८ धावांवर त्रिफळाचीत केले. गिलने १४६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी केली. रिषभ पंत तिसऱ्या दिवस अखेर ५५ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने १२५ षटकात ४ बाद ४८६ धावा केल्या.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
गिलने धोनीचा मोडला विक्रम
गिलने ९८ धावा केल्याने तो आता न्यूझीलंडमध्ये कसोटीत सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने एमएस धोनीच्या ६८ धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. धोनीने २०१४ मध्ये वेलिंग्टन कसोटीत ६८ धावांची खेळी केली होती. गिल आणि धोनीच्या पुढे या विक्रमाच्या यादीत मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावसकर आहेत.
न्यूझीलंडमध्ये कसोटीत सर्वोच्च धावांची खेळी करणारे भारतीय कर्णधार
- १९२ धावा – मोहम्मद अझरुद्दीन, ऑकलंड, १९९०
- ११६ धावा – सुनील गावसकर, ऑकलंड, १९७६
- नाबाद १०३ धावा – मोहम्मद अझरुद्दीन, वेलिंग्टन, १९९८
- ९८ धावा – शुभमन गिल, वेलिंग्टन, २०२६
- ६८ धावा – एमएस धोनी, वेलिंग्टन, २०१४
नर्व्हस नाईंटीचा शिकार
दरम्यान, शुभमन गिल चौथ्यांदा कसोटीत नव्वदीत बाद झाला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे ९१ धावांवर बाद झाला होता, तसेच २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत ९१ धावांवर आणि न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत ९० धावांवर बाद झाला होता. मात्र तो पहिल्यांदाच कर्णधार असताना कसोटीत नव्वदीत बाद झाला आहे. त्यामुळे आता त्याचा नव्वदीत बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे.
कसोटीत सर्वाधिकवेळा नव्वदीत बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये एमएस धोनी अव्वल क्रमांकावर आहे, तो ४ वेळा नव्वदीत बाद झाला आहे, तर सचिन तेंडुलकर दोन वेळा कर्णधार असताना नव्वदीत बाद झाला आहे. याशिवाय नारी कॉन्ट्रॅक्टर, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली आणि शुभमन गिल प्रत्येकी १ वेळा कर्णधार असताना नव्वदीत बाद झाले आहेत.
तथापि, न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात नव्वदीत बाद होणारा गिल दुसराच भारतीय कर्णधार आहेत. यापूर्वी एमएस धोनी २०१० मध्ये नागपूर कसोटीत ९८ धावांवरच न्यूझीलंडविरुद्ध बाद झाला होता. त्याला डॅनिएल विट्टोरीने बाद केले होते.




