गडचिरोली

*धर्मराव विद्यालय सिरोंचाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्राणहिता नदीघाटावर राबविले स्वच्छता अभियान*

सिरोंचा :

“गाव, समाज आणि पर्यावरणासाठी आपला सहभाग हीच खरी गुरुदक्षिणा” हा उदात्त विचार कृतीत उतरवत धर्मराव विद्यालय, सिरोंचा येथील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आज, गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्राणहिता नदीघाटावर भव्य स्वच्छता अभियान राबवले. सकाळी ७.३० वाजल्यापासून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत नदीघाट परिसराची साफसफाई केली.
आपण ज्या प्राणहिता नदीच्या सान्निध्यात वाढलो आणि जिने आपल्या गावाला जीवन दिले, तिचे संरक्षण व स्वच्छता करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नदीघाटावर साचलेला कचरा, प्लास्टिक आणि घाण साफ करून माजी विद्यार्थ्यांनी हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी मोलाचे श्रमदान केले.
या उपक्रमाचे आयोजन धर्मराव विद्यालय, सिरोंचाच्या १९९६-१९९७, १९९७-१९९८, १९९८-१९९९, १९९९-२०००, २०००-२००१ आणि २००२-२००३ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले होते. माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि पर्यावरण रक्षणाच्या पुढाकाराचे संपूर्ण सिरोंचा परिसरातून कौतुक होत आहे.

header