ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारला

गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारला

टीम भावना जोपासून काम करण्याचे आवाहन

गडचिरोली दि.26: गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला. श्री दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) तसेच इतर विभागप्रमुख यांनीदेखील श्री पंडा यांचे स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे. ही कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना टीम भावना जोपासून काम करण्याचे आवाहन केले.

श्री. अविश्यांत पंडा हे 2017 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून कार्य केले आहे.

माजी जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त या पदावर झाली आहे.

000