ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे. तरी सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.