नवी दिल्ली: दिल्लीतील फ्लॅट खरेदी प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचा कोच आणि माजी खासदार गौतम गंभीर यांना दिल्ली हयकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुनावणी करत असताना दिल्लीतील सत्र न्यायालयाने गौतम गंभीर याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान या निर्णयाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गौतम गंभीरला मोठा दिलासा मिळाला आहे.
फ्लॅट खरेदी प्रकरणात दिल्लीच्या सत्र न्यायालयाने गौतम गंभीरविरुद्ध फसवणुकीचा खटला चालवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गौतम गंभीरने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. गौतम गंभीरच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने सत्र न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. हा खटला पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
रुद्र बिल्डवेल, एचआर इन्फ्रासिटी आणि यूएम आर्टिटेक्ट्स या कंपन्यांमध्ये अनेक खरेदीदारांनी फ्लॅट खरेदी केले होते. मात्र या कंपन्यांनी घर खरेडीदारांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित कंपन्या आणि संचालकांवर घर खरेडीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण कोर्टात देखील सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी खासदार गौतम गंभीर हा रुद्र बिल्डवेल कंपनीचा ब्रॅंड ॲम्बेसिटर आहे. त्यामुळे गौतम गंभीरचे नाव देखील तक्रारीत समाविष्ट करण्यात आले होते. त्यावर सत्र न्यायालयाने गौतम गंभीरसह अनेकांची निर्दोष सुटका केली होती.
कोर्टाने निर्दोष सुटका केल्याचा निर्णय मान्य न झाल्यामुळे खरेदीदारांनी विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. ट्रायल कोर्टाने २०२० मध्ये प्राथमिक आधारावर तीन लोकांना निर्दोष सोडले होते. त्यात गौतम गंभीरचे नाव होते. दरम्यान या निर्णयाविरुद्ध विशेष कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करत असताना, गौतम गंभीरवर फसवणुकीचा खटला चालवण्यास सांगितले. त्याविरुद्ध गौतम गंभीरने हायकोर्टात धाव घेतली होती. गंभीरच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे गंभीरला मोठा दिलासा मिळाला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीआधी कोच गौतम गंभीरने मोडला नियम
गौतम गंभीरने संघाच्या निवड समितीत सामील होऊन मोठा नियम मोडला. वास्तविक, बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही प्रशिक्षक निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, परंतु गंभीर हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी झालेल्या निवड बैठकीचा भाग होता. मात्र, बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु यासंदर्भात अनेक वृत्त समोर आले आहेत. टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-3 ने व्हाईट वॉशचा सामना करावा लागला होता. घरच्या भूमीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा व्हाईटवॉश होण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताच्या संघाची फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.