टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे शासनाचे मुख्य उद्दिष्ट
टसर रेशम कृषि मेळावा संपन्न
गडचिरोली दि. ८ : आगामी वर्षांत टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आणि रेशीम उत्पादनक्षमता वाढवणे हे संशोधन आणि विकासाचे मुख्य लक्ष असून टसर रेशीमला त्याच्या चमकदार आणि अद्वितीय गुणवत्तेसह लोकप्रिय बनवणे आवश्यक असल्याचे मत रांची येथील केंद्रीय रेशम बोर्ड-केन्द्रीय टसर अनुसंधान व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन.बी. चौधरी यांनी आज व्यक्त केले.
टसर उद्योगाला गती प्रदान करण्यासाठी, केंद्रीय रेशीम बोर्ड-केंद्रीय टसर अनुसंधान व प्रशिक्षण संस्थान रांची आणि महाराष्ट्र राज्य रेशम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी, येथे टसर रेशम कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. एन.बी. चौधरी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला रेशीम विभागाचे उपसंचालक डॉ. महेंद्र धावले,सहायक संचालक हेमंत लाडगांवकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा रेशीम अधिकारी सी.आर. वासनिक उपस्थित होते.
डॉ. एन.बी. चौधरी यांनी पुढे सांगितले की टसर रेशम शेतीमध्ये ग्रामीण रोजगार निर्माण करण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता आहे.यासाठी केंद्रीय रेशम बोर्ड आणि राज्य रेशम विभागाचा आरमोरी, गडचिरोली, महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रांमध्ये टसरच्या उत्पादन वाढीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. रांची येथील संस्थान टसर रेशमाच्या संशोधन आणि विकासासाठी समर्पित एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले
निसर्गाने पानांपासून रेशम तयार करण्याची अद्भुत कला टसर रेशम कीटकानला प्रदान केली आहे. टसर रेशीम आपल्या समृद्ध बनावट आणि नैसर्गिक, गडद सोनेरी रंगासाठी मूल्यवान आहे. रेशीम उद्योग नागरिकांना आर्थिक उत्पन्नासाठी फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन डॉ.चौधरी यांनी केले
कार्यक्रमाची संचालन सी.आर. वासनिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल कुमार ढोले यांनी केले.
मेळाव्याला कृषि अधिकारी नीलेश गेदाम, रेशीम कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेशीम उत्पादक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.