गडचिरोली दि ३:
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो.
जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता विविध प्रकारचे पुनर्वसनात्मक शिक्षण व प्रशिक्षनात्मक कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद द्वारा वर्षभर आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘जागतिक दिव्यांग दिनाचे’ आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित सदस्य रामदास मसराम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकीत्सक माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक सतिश साळूंखे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजीत राउत उपस्थित होते.
या ‘जागतिक दिव्यांग दिनाचे’ औचित्य साधुन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचेद्वारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना यु. डी. आय. डी. कार्ड, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, विविध साहित्य व उपकरणे तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सामूहिक तथा वैयक्तिक विविध कल्याणकरी योजनेचे लाभ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली यांचेद्वारा दिव्यांग युवकांकरीता निःशुल्क आयोजित करण्यात येत असलेल्या ‘कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमा’चे उद्घाटन श्री रामदास मसराम व श्री. आर. आर. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रशिक्षण निवड प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.
यावेळी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.