मुलचेरा:- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा व कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोबर,२०२४ रोजी मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा चक या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते. यावेळी कपाशीवरील गुलाबी , बोंड अळीच्या निगराणीसाठी ट्रॅप व कामगंध सापळे, जैविक खते, किटकनाशक व पाण्यात विरघळणारे नत्र:स्फुरद:पालाश (१९:१९:१९) खते इत्यादी निविष्ठा उपस्थित अनुसूचित जमाती समूहातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे डॉ. दिपक नगराळे, समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र), श्री. व्ही .पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी-मुलचेरा, श्री. एस. आर. गरमळे-कृषी पर्यवेक्षक, श्री. रोहित कोडापे (कृषी सहाय्यक), श्री. सुरेश मडावी (पोलीस पाटील-चुटूगुंटा) व श्रीमती. साधना दिलीप मेश्राम (सदस्य ग्रामपंचायत- चुटूगुंटा) इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला, प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दिपक नगराळे यांनी विशेषत: अनुसूचित जमाती समूहातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेच्या उद्दिष्टांविषयी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. त्यांनी प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले आणि धान तसेच कापूस पिकांचे आरोग्य राखण्यासाठी विविध रोग व्यवस्थापन पद्धतीद्वारे एकात्मिक पीक व्यवस्थापन कसे करावे यावरही त्यांनी भर दिला. तसेच श्री. व्ही .पी. पाटील यांनी कृषि योजना व गडचिरोली जिल्ह्यातील कापूस आणि धान या पिकांची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडली. तसेच श्री. बोथीकर यांनी कपाशी व धान पिकांवरील प्रमुख किडींबद्दल सविस्तर माहिती देऊन एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात व शेतकर्यांच्या नोंदणीसाठी श्री. सारंग श्रीरामे (वाय. पी.-१) के.का.सं.सं., नागपूर यांचे सहकार्य लाभले. यावेळी चुटुगुंटा आणी येल्ला गावातील एकूण ५० आदिवासीं शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ झाला.