महाराष्ट्रामध्ये ५० टक्के पाण्याची कमतरता आहे. जलसंधारण ही एकमेव गोष्ट अवर्षणग्रस्त राज्याचा प्रश्न सोडवू शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे विश्वस्त आमिर खान, सत्यजित भटकळ, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, हेमंत रासने, प्रशांत बंब, परिणय फुके, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘२०२० मध्ये केंद्र सरकारने एक पाणी सारणी अहवाल केला होता. त्यामध्ये देशाच्या सर्व राज्यांतील पाण्याची पातळी खाली गेली होती. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य होते ज्यामध्ये पाण्याची पातळी वाढलेली होती. जलसंधारण क्षेत्रात पानी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना चांगले काम करत आहेत. ‘आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, असे म्हणत मी कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर आहे.’
हा कार्यक्रम केवळ समाजाचा नाही तर भारताच्या ‘जीडीपी’चा (सकल राष्ट्रीय उत्पादनाचा)आहे. देशाला आर्थिक महासत्ता करण्याचा रस्ता जैन समाजाच्या मार्गानेच जातो. जैन समाज दातृत्वामध्ये अग्रणी आहे. नि:स्वार्थ सेवा हा गुण आहे. केवळ सरकार सारे काही करू शकणार नाही हे ध्यानात घेऊन भारतीय जैन संघटना आणि पानी फाउंडेशनने जलसंधारणामध्ये काम केले आहे. मानवी बुद्धिमत्तेचा वापर आपण करणार नसू तर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होणार नाही. सज्जनशक्तीच्या पाठीशी राहणे हे कर्तव्यच नाही तर जबाबदारी आहे, या भावनेतून कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.