आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्रंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले सन २०२७ मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा महत्त्वाचा सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांचा सहभाग महत्वाचा असून सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत प्रत्येक यंत्रणांनी केलेल्या कार्यपूर्तीचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रत्येक बैठकीस संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केल्याल्या आराखड्याचे सादीकरण बैठकीत केले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आराखड्यात आणखी समाविष्ठ करावयाच्या बाबी व करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधु महंत, आखाडा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत सांगितले.