ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात सर्वप्रथम गडचिरोली जिल्हा सह.बँकेला इंटरनेट बँकिंगचा परवाना

गडचिरोली : चार दशकांच्या वाटचालीत राज्यातच नाही तर देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरनेट बँकिंगचा परवाना दिला आहे. बँकेचा स्थापन दिवस असलेल्या 8 नोव्हेंबर रोजीच ही आनंदाची बातमी रिझर्व्ह बँकेने दिली. विशेष म्हणजे इंटरनेट बँकिंगचा परवाना मिळालेली गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील एकमेव जिल्हा सहकारी बँक ठरली आहे. या सुविधेमुळे बँकेच्या ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातून 24 तास बँकिंगचे व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे.

महाराष्ट्रात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. आतापर्यत कोणत्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंटरनेट बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना प्राप्त झालेला नव्हता. हा परवाना देताना रिझर्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेची आर्थिक स्थिती, बँकेचे एनपीएचे प्रमाण, ई-निकष आदींची पूर्तता करीत असलेल्या बँकांनाच परवाना प्राप्त

होत असतो.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हे सर्व निकष पूर्ण केले असल्याने राज्यात सर्वप्रथम या बँकेला हा परवाना मिळाला, असे बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

आता 24 तास बँकिंग सेवा मिळणार

दि.31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर बँकेने 3700 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. बँकेचा नेट एनपीए शुन्य टक्के आहे. जीडीसीसी बँकेला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा परवाना प्राप्त झाल्यामुळे ग्राहकांना 24 तास बँकिंग सेवा उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांना शाखेत न येता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकेच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, खातेदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद, महिला बचत गटांचे सदस्य, बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांच्या सहकार्य आणि सदिच्छांमुळे जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेकडून इंटरनेट बँकिंगचा परवाना प्राप्त झाल्याचे सांगत बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

57 शाखांमधून शहरी, ग्रामीण भागात सेवा

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यात 57 शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 4 लाख 35 हजार खातेदारांना दुर्गम, ग्रामीण व शहरी भागात अत्याधुनिक डिजीटल सुविधांसह बँकिंग व्यवहाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. बँकेने यापूर्वीच ग्राहकांना आरटीजीएस, एनईंएफटी, आयएमपीएस, मोबाईल बँकिंग, शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि इतर ग्राहकांना रुपे डेबिट कार्डच्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.