ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा आणि अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न 

गडचिरोली,(जिमाका),दि.04: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान- किमान कार्यक्रम माहे डिसेंबर- 2024 नुसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड, जि गडचिरोली येथे ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012’ आणि ‘अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27 डिसेंबर2024 रोजी करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, अॅड. कु. स्नेहा ए. मेश्राम, सहा. लोक अभिरक्षक गडचिरोली, अॅड. श्री कदम, संकेत एस. नानोटी, पोलीस स्टेशन भामरागड हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमावेळी डॉ. सौ. मंदाकिनी प्रकाश आमटे, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, समिक्षा आमटे, शाळा प्रशासन, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिक्षा आमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आर. आर. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बालवयात होणारे अत्याचार हे कसे रोखले जाऊ शकतात, चांगला स्पर्श- वाईट स्पर्श, वाईट प्रसंगावेळी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मादक पदार्थाचे सेवनाचे दुष्परिणामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमावेळी अॅड. कु. स्नेहा ए मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, बालकांसोबत लैंगिक अत्याचार घडत असतांना याबाबत आपल्या जवळीक शिक्षक पालक यांना त्याबाबत न घाबरता माहिती दयावी तसेच शिक्षक आणि पालक यांनी याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.

अॅड. कदम यांनी मुलांशी हितगुज करून विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टिंचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात व यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन एस. के चुधरी यांनी केले तर आभार लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा यांचे वतीने मानण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीकरीता लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी त्याप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली चे एन. आर. भलमे, वरिष्ठ लिपीक, एस. एस. नंदावार, शिपाई यांनी सहकार्य केले