मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपली वर्णी लागावी असे महायुतीमधील ज्येष्ठ तसेच दोनपेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्यांना वाटू लागले आहे. त्यातच कालिदास कोळंबकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी तर उघडपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करण्याची तारेवरची कसरत नेतेमंडळींना करावी लागणार आहे. ९१व्या घटना दुरुस्तीनुसार विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या १५ टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याने तीन जागा भरल्या गेल्या आहेत. मंत्रिमंडळात आणखी ४० जणांचा समावेश करता येऊ शकेल.