राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत मुलचेराच्या विद्यार्थिनींची झळाळती कामगिरी
हाशी मंडल व नंदिनी डोके यांनी पटकावला राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांक
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा 2025-26 मध्ये मुलचेरा तालुक्यातील हाशी मंडल आणि नंदिनी डोके या प्रतिभावान विद्यार्थिनींनी आपल्या उल्लेखनीय कलागुणांच्या बळावर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा तसेच शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय मुलचेरा यांचा मान अभिमानाने उंचावला आहे.
ही स्पर्धा राज्य शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय फेरीत यश मिळविल्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय फेरीसाठी पात्रता मिळवली. स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कला, आत्मविश्वास आणि सादरीकरणातील सर्जनशीलता यांमुळे परीक्षक मंडळ प्रभावित झाले आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थिनी हाशी मंडल व नंदिनी डोके, तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका कु. अनिमा मिस्त्री तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अ निसार शेख तसेच विद्यालयाचे शिक्षक रुंद यांनी परिश्रम घेतले .
संस्थेचे उपाध्यक्ष श्री जमिर हकीम आणि श्रीमती शाईन ताई हकीम तसेच मुलचेरा तालुक्याचे गट विकास अधिकारी,गटशिक्षण अधिकारी श्री. धनंजय कांबळे,व संपूर्ण गट समन्वय केंद्र तसेच पालक आणि स्थानिक नागरिकांनी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
स्थानिक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितले की, “या विद्यार्थिनींचे यश हे केवळ त्यांच्या प्रतिभेचे नव्हे तर तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचेही द्योतक आहे. अशा यशस्वी विद्यार्थिनीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.”
या यशामुळे संपूर्ण मुलचेरा गर्भ प्राप्त झाले आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यालय परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






