चीचडोह बॅरेज मधील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त प्रकारे कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज दिल्या.
आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर कालपासून आले आहेत. त्यांनी काल शासकीय विभाग प्रमुखाचा आढावा घेतला तर आज नवेगाव अंगणवाडी, चिचडोह बॅरेज, मार्कंडा येथील शिवमंदिर, आरोग्य केंद्र व आदिवासी आश्रमशाळेला भेट देवून विविध विकास कामांची पाहणी केली.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहूल मीना, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
संरक्षण राज्यमंत्री श्री सेठ यांनी आज सकाळी नवेगाव येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राची पाहणी केली. त्यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रातील स्तनदा मातांना पोषण विषयक बाळंतविडा किट पुरवठा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी अंगणवाडी परिसरात वृक्षारोपणही केले. श्री सेठ यांनी आदिवासी विकास विभागाच्या मार्कंडादेव येथील शासकीय आश्रमशाळेत भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच मार्कंडा येथील आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली व रूग्णसेवेबाबत उपलब्ध साधनसामग्रीची माहिती घेतली. त्यांनी मार्कंडा येथील शिवमंदिरात दर्शन घेवून मंदिराची पाहणी केली तसेच मंदिर बांधकामाविषयीच्या नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.