चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचं बंगळुरूतील मुख्यालय गाठलं. तिथे त्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची पाठ थोपटून मोदींनी त्यांचं कौतुक केलं.
स्पेस मिशनमध्ये टचडाऊन पॉईंटला नाव देण्याची परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान 3 उतरलं, त्या जागेचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान 3 चं मून लँडर उतरलं, ती जागा आता शिवशक्ती पॉईंट नावानं ओळखली जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. यानंतर इस्रोच्या कार्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.
2019 मध्ये भारताचं चांद्रयान 2 मिशन अपयशी ठरलं. चांद्रयान-२ अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरलं. त्याला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयश आलं. चांद्रयान-2 नं क्रॅश लँडिंग केलं. त्या ठिकाणालादेखील नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. चांद्रयान 2 नं जिथे क्रॅश लँडिंग केलं, ते स्थान यापुढे तिरंगा पॉईंट म्हणून ओळखलं जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. भारताचं चांद्रयान 3 नं 23 ऑगस्टला चंद्रावर लँडिंग केलं, हा दिवस यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल, अशीही घोषणा पंतप्रधानांनी केली.