अमृत महाआवास अभियान २०२२-२३
मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे हा या अभियानाचा हेतू आहे. या अभियान कालावधीत 1) भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, 2) घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, 3) मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे, 4) सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, 5) प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, 6) ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, 7) इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे, 8) सामाजिक लेखापरीक्षण वेळेत करणे, 9) शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे आणि 10) नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, असे 10 उपक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.
या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मंत्री श्री. महाजन यांनी दिली.