कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ
मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 325 नोकरीइच्छूक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, नोकरीइच्छूक उमेदवार यावेळी उपस्थित होते.
मेळाव्यात 33 कंपन्या, उद्योग तथा आस्थापना व शासनाच्या 7 आर्थिक विकास महामंडळांनी सहभाग घेतला. कंपन्यांनी त्यांच्याकडील 8 हजार 135 रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, अँड्रॉमेडा सेल्स, एअरटेल, सॅपीओ, कोटक महिंद्रा, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया आदी कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. मेळाव्यामध्ये साधारण 285 उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर 20 उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली.