– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर
– रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी
उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2025 मध्ये होणार्या Uttar Pradesh- Mahakumbh महाकुंभासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. 2025 मध्ये होणार्या महाकुंभासाठी 100 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. श्रृंगवरपूर येथे निशाद राज गुहा सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्यासाठी 14.68 कोटी रुपये, आझमगढ जिल्ह्यातील हरिहरपूर येथे संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी 11.79 कोटी रुपये आणि चित्रकूट येथे महर्षी वाल्मीकि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्यासाठी 10.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे खन्ना यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त अयोध्येतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन संस्थेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 37.9 कोटी पर्यटक आले. त्यापैकी 37.77 कोटी भारतीय आणि 13.43 लाख विदेशी पर्यटक होते, असे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव आयोजित करण्यात आला. ‘राम की पौडी’ येथे प्रज्वलित करण्यात आलेल्या 22 लाख 23 हजार पणत्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पर्यटन विकास भागीदारी योजनेंतर्गत एक पर्यटनस्थळ विकसित करण्याची योजना आहे. मागील सरकारने राज्यातील सांस्कृतिक वारशांकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात ते विकसित केले जात असल्याचे खन्ना यांनी सांगितले.
अनेक शहरांचे सौंदर्यीकरण
अयोध्या, वाराणसी, चित्रकूट, लखनौ, विंध्याचल, प्रयागराज, नायमिशारन्या, गोरखपूर, मथुरा, बाटेश्वर धाम, गढमुक्तेश्वर, शुकतीर्थ धाम, माँ शाकम्बरी देवी, सारनाथ आणि इतर महत्त्वा पर्यटनस्थळांवर पर्यटन विकास आणि सौंदर्यीकरणाची कामे सुरू करण्यात आल्याचे खन्ना यांनी सांगितले.