(खासदार अशोक नेते यांची पत्रपरिषदेत माहिती)
वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी 322 कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा 50 टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीतर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव व बुथवर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुक्कामी थांबणार आहेत. या प्रवासी कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवीत मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहितीही भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकारला भाजपा शासित अनेक राज्य सरकारनीही उत्तम साथ देत आपआपल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशभरात गाव चलो अभियान सुरु करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात प्रत्येक गावात व बुथवर भाजपाचे प्रशिक्षित प्रवासी कार्यकर्ते मुक्कामी थांबून बुथवर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार आहेत. बुथवरील प्रत्येक घरी मोदी सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिल्या जाणार असल्याचेही खासदार नेते यावेळी म्हणाले.
पत्रपरिषदेला लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, गिता हिंगे, अवलास भांडेकर, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर उपस्थित होते.