दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
१५ हजार रोजगार निर्मिती होणार
दावोस दि. १७: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी करणार आहे. त्यामाध्यमातून १५ हजार रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प करण्यात येणार आहे. ५ एमएमटीपीए (मिलियन मेट्रीक टन्स् पर ॲनम) क्षमतेचा हा कोल गॅसीफिकेशनचा प्रकल्प आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोल गॅसीफिकेशन ही काळाची गरज असून कोल गॅसीफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे सिंथेसीस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे भारतातील कार्कारी संचालक बाळासाहेब दराडे, गोपी लटरटे, निहीत अग्रवाल, अजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.
