ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील ‘या’ विभागात 2063 पदांची भरती होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा…

महाराष्ट्रात आज स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या स्वतंत्र  दिव्यांग मंत्रालयात लवकरच तब्बल 2063 पदांची भरती केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, या विभागासाठी 1143 कोटी रुपयांची निधी राज्य सरकारने दिल्याचे सांगितले.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे, अशी अनेकांची मागणी होती. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने आज स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली. त्यामुळे दिव्यांगांसाठी आज सोन्याचा दिवस असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, राज्यात आपलं सरकार आल्यापासून दिव्यांगांना कोणत्याही मागण्यांसाठी आंदोलन करावं लागलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयासाठी स्वतंत्र सचिव

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयासाठी स्वतंत्र सचिव असेल, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण 2063 पदे भरली जाणार आहेत. कुठलंही धोरण ठरवताना दिव्यांगांचे मत विचारात घेतले जाईल. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय फक्त 24 दिवसांत झाला असून, आजपासून त्याचे कामकाज सुरु होणार आहे. या मंत्रालयासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयामार्फत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल, विविध पारितोषिके, स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसाहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, गतिमंद मुलांसाठी बालगृहे, दिव्यांगांच्या विवाहास प्रोत्साहन देणे, आदी कामे केली जाणार आहेत.