गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा आजच सुरुवात करूया… कुटुंब नियोजनावर बोलूया…

आतापर्यंत 37 नसबंदी शस्त्रक्रिया

गडचिरोली (दि.28) : कुटुंब कल्याण अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसोबतच समाजातील बालविवाह रोखणे, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध करणे, कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा वापर करणे आणि कुटुंबाचे मानसिक, आर्थिक, सामाजिक उन्नती करून कौटुंबिक आरोग्य अबाधित राखणे अपेक्षित आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबात पती-पत्नी मिळून, कुटुंब नियोजनावर बोलायला सुरुवात केली पाहिजे. पुरुषांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःची नसबंदी करण्याचे व कुटुंब कल्याण कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा अत्यंत सोपी असून याकरिता दवाखान्यात भरती होण्याची आवश्यकता नसते. शस्त्रक्रियेनंतर अगदी अर्ध्या तासात पुरुष स्वतः चालू शकतो. शस्त्रक्रियेनंतर पुरुषामध्ये कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पुरुषांनी स्वतः शस्त्रक्रिया करून घेण्याचे आवाहन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके यांनी केले.
कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण आहे. मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून सुद्धा अद्यापही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते. कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना देण्यासाठी तसेच पुरुष नसबंदी पद्धती जसे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, निरोधचा वापर यांचे प्रमाण वाढविण्याच्या हेतूने पुरुष नसबंदी पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा 2024 राबविण्यात येत आहे. सदर पंधरवडा 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर सेवा लाभार्थ्यांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रिये बाबत समाजात जनजागृती होऊन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास निश्चितच मदत होईल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली तसेच सदर पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्याचे सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याकामी आवश्यक मनुष्यबळ व संसाधन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके यांनी केले आहे.
सदर पंधरवडा हा दोन टप्प्यात राबविण्यात येईल पहिला टप्पा – संपर्क आठवडा – कालावधी 21 ते 27 नोव्हेंबर 2024 , दुसरा टप्पा – सेवा आठवडा – कालावधी 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.