मुंबई, दि. 3 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत होते.
मंत्रालयात गुरुवारी कृषिमंत्री श्री. सत्तार यांच्यासोबत मुल कृषी महाविद्यालयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषिमंत्री श्री.सत्तार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने स्वाक्षरी करुन निधी मंजूर केला.
मुल-मरोडा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ६४.५९ कोटी रूपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. शासनाच्या कृषी व पदुम विभागाच्या 16 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्वये या कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला होता.
श्री. मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात दि. २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुल-मरोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत १३३.३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी करून ६४.५९ कोटीच्या प्रस्तावाला गेल्या वर्षी मार्च मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
००००