जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
दावोस, दि. १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.
अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा
जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.