बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. दीर्घ काळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी होत होती. जी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे जननायक अशी त्यांची ओळख होती. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म १९२४ मध्ये झाला होता. बिहार राज्याचे ते पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन लिहिलं आहे की मला या गोष्टीचा आनंद आहे की सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या जन्माचं हे शताब्दी वर्ष आहे आणि त्याच वर्षात ही बातमी आली आहे.