मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दि.२५फेब्रुवारी२०२४रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०१४ मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.