पोलिसांसह निवडणूक कर्तव्यावर व अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही मतदान
गडचिरोली १२:६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सोमवार ११ नोव्हेंबर पासून टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. ईव्हीएम द्वारे प्रत्यक्ष मतदान बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी आहे.
सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस व होमगार्ड विभागाच्या मतदानासाठी गडचिरोली येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक मतदान सुविधा केंद्र तर तहसील कार्यालयात दोन मतदान सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले.या मतदान केंद्रावर शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कार्यरत गडचिरोली जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील पोलीस व होमगार्ड विभागातील मतदार मतदान करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी टपाली मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बुधवार दिनांक १३ व गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी येथील गोकुळ नगरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान सुविधा केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार दिनांक १४ ते शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर या कालावधीत येथील तहसील कार्यालयातील मतदान सुविधा केंद्रावर मतदान होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील २१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फार्म १२ डीच्या पार्ट दोन मध्ये संबंधित संस्थेने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरचे प्रमाणपत्र देऊन १२ डी फार्म भरून अर्ज सादर केला होता.त्यापैकी २१० अर्ज मंजूर झालेले आहेत.
निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी रविवार दिनांक १७ ते मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान पथक रवाना होते वेळेस येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान सुविधा केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक कर्तव्यावर नेमलेले १ हजार ५६७ कर्मचारी टपाली मतदानासाठी आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगरपरिषेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या नियंत्रणात नेमलेल्या पथकाकडून टपाली मतदानाचे काम सुरू आहे.
तसेच जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत आणि ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मतदान आहे त्यांनी मतदान दिवसाच्या पाच दिवसांपूर्वी शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत फार्म १२ अ भरून देण्याचा कालावधी आहे. अशा कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत निवडणूक कर्तव्यावर असल्याचे प्रमाणपत्र(ईडीसी) देण्यात येईल. हे प्रमाणपत्र दिनांक १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत टपाली मतदान कक्षातून प्राप्त करून घेता येईल व त्यांना मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवार २० नोव्हेंबर रोजी जवळच्या मतदान केंद्रावर ईडीसी जमा करून ईव्हीएम वर मतदान करता येईल.