ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

 गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत दिसून आली असून जिल्ह्यात एकूण 29 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यापैकी डॉ. मिलिंद नरोटे, मनोहर पोरेटी, कृष्णा गजबे, रामदास मसराम, धर्मरावबाबा आत्राम, अम्ब्रीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम या दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज, 23 नोव्हेंबरला फैसला होणार आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व काँग्रेस उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यात तुल्यबळ लढत दिसून आली. काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना डॉ. सोनल कोवे यांच्या रुपाने बंडखोरीचा थोडाफार फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच महायुतीने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाटेचाही मार बसू शकतो. यावेळी महिलांची संख्या मतदानासाठी मोठी असल्याने या महिलांच्या मतदानाचा फायदा भाजप व महायुतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.
gadchiroli constituency आरमोरी निर्वाचन क्षेत्रातील भाजप उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या विरोधात काँग्रेसचे रामदास मसराम यांनीसुद्धा कडवे आव्हान उभे केले होते. मात्र मसराम यांनाही आनंदराव गेडाम व शिलू चिमुरकर या दोन उमेदवारांच्या बंडखोरीचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. कृष्णा गजबे यांच्या विजयासाठी आरमोरी मतदारसंघात सावकार बंधूंनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. ही निवडणूक सावकारच्या प्रतिष्ठेची मानली जात असून गजबेंच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे.
        अहेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासुद्धा प्रतिष्ठेचा कस लागला असून त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव महाराज ताकदीने उभे होते. याशिवाय धर्मरावबाबांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उभी राहिल्याने भाऊ-बहिण, काका-पुतण्या, वडील-मुलगी अशी नात्यांमधील लढत या मतदारसंघात जनतेला बघायला मिळाली. मुलीच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांना या निवडणुकीत बरेच परिश्रम करावे लागले. या मतदारसंघात तिरंगी लढत दिसून आली असून या तिनही उमेदवारांच्या भाग्याचा फैसला देखील आज होणार आहे.