ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एमपीएससीचा मोठा निर्णय! वयोमर्यादा वाढवल्यानंतर आता दोन परिक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णाय कोरोना काळातील परिक्षा झाल्या नसल्याने विशेष बाब म्हणून घेण्यात आला होता. यानंतर आता आयोगाने गट ब आणि गट क सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ठराविक जिल्ह्यातील केंद्रावर परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२०) राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPSC Exam Schedule : ‘एमपीएससी’च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आयोगाने ‘गट ब आणि गट क’च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ५ जानेवारी २०२५ रोजी ‘महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४’ होणार होती. ती आता २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. तसेच २ फेब्रुवारी रोजी २०२५ रोजी होणारी ‘महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४’ आता ४ मे २०२५ ला होईल.

आयोगाने जाहीर केल्यानुसार, ‘गट ब आणि गट क’च्या परीक्षांसाठी उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे. अशा उमेदवारांची परीक्षा ठराविक सहा जिल्हा केंद्रावर होणार आहे. यामध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.